Home Uncategorized कहाणी महाराष्ट्रदिनाची, महाराष्ट्राच्या लढ्याची !

कहाणी महाराष्ट्रदिनाची, महाराष्ट्राच्या लढ्याची !

155
0
SHARE

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राला दिल्लीचाच विरोध होता. महाराष्ट्र-गुजरात यांच्या एकत्रित ‘द्वैभाषिक’ राज्याचा अनैसर्गिक खेळ केंद्र सरकार खेळत होतं. हे संतापजनक होतं. त्यामुळे मराठी जनतेपुढे विराट आंदोलनावाचून पर्यायच उरला नाही. मग मात्र यच्चयावत् मराठी जनतेने आपली ताकद दाखवून दिली. समाजाच्या सर्व क्षेत्रातील संयुक्त महाराष्ट्राचे पुरस्कर्ते एकवटले. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या रूपाने त्या एकजुटीला दिशा मिळाली आणि महाराष्ट्रभर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा जयघोष सुरू झाला.
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला आज साठ वर्षे पूर्ण होत आहेत. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र साकार करण्यासाठी मराठी जनतेने प्रखर लढा देऊन हे उद्दिष्ट साध्य केले. एकशे पाच आंदोलकांनी हौतात्म्य पत्करले. अवघा महाराष्ट्र पेटून उठला. आंध्रप्रदेशात पोट्टी श्रीरामुलू यांच्या बलिदानानंतर अधिक राज्ये अस्तित्वात यायला सुरुवात झाली वास्तविक काँठोसने राष्ट्रीय चळवळीच्या काळात 1920 मध्येच भाषिक प्रांतरचना मान्य केली होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ती विनासायास साकार व्हायला काहीच हरकत नव्हती. पण तसे घडले नाही. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राला दिल्लीचाच विरोध होता. त्यामुळे मराठी जनतेपुढे विराट आंदोलनावाचून पर्यायच उरला नाही. मग मात्र यच्चयावत् मराठी जनतेने आपली ताकद दाखवून दिली. समाजाच्या सर्व क्षेत्रातील संयुक्त महाराष्ट्राचे पुरस्कर्ते एकवटले. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या रूपाने त्या एकजुटीला दिशा मिळाली आणि महाराष्ट्रभर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा जयघोष सुरू झाला.
‘महाराष्ट्राचे महामंथन’या लालजी पेंडसे यांच्या महागंथात संयुक्त महाराष्ट्राच्या देदीप्यमान लढय़ाचे तपशीलवार वर्णन आहे. या लढय़ात सर्व राजकीय पक्ष होते. साहित्यिक, पत्रकार होते. गाडगेबाबांसारखे समाजसुधारक संत, स्वातंत्र्यवीर सावरकर, क्रांतीसिंह नाना पाटील, महर्षी अण्णासाहेब कर्वे, विनोबा भावे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा सर्व मान्यवरांचा महाराष्ट्राच्या मागणीला पाठिंबा होता. पंडित नेहरुंचे सरकार संभ्रमात असले तरी अनेक काँठोसजन संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने होते. इतकंच नव्हे तर 1959 मध्ये काँठोसच्या अध्यक्ष झालेल्या इंदिरा गांधी यांनी महाराष्ट्राच्या लढय़ाचं समर्थन केलं होतं!
प्रत्यक्ष लढय़ात तर, शेलारमामा होऊन उतरलेले प्रबोधनकार ठाकरे, सेनापती बापट, ‘मराठा मधून मोराजी सरकारवर टीकेची तोफ डागणारे आचार्य अत्रे, भाई माधवराव बागल, क्रांतीसिंह नाना पाटील, दाजिबा देसाई, कॉ. डांगे, साथी एस.एम.जोशी, रणरागिणी अहिल्या रांगणेकर, गोदावरी परूळेकर, रामभाऊ म्हाळगी, दत्ता देशमुख, नाथ पै, ना.ग. गोरे अशा नेतेमंडळींची मांदियाळी मार्गदर्शन करू लागली. मुंबईत भाऊसाहेब राऊत यांच्या बंगल्यावर बैठका होऊ लागल्या. लढय़ाचे स्वरुप प्रखर, परंतु शांततापूर्व निदर्शनांचे असावे, असा समितीचा प्रयत्न होता. लोकशाही मार्गाने न्याय्य मागणीसाठी सत्याठाह करण्याची तयारी झाली. मोरारजी सरकारने मात्र अकारण आकसाने बेछूट गोळीबाराचे आदेश दिले. परंतु त्यामुळे लढा अधिक प्रभावी झाला.
महाराष्ट्र राज्यस्थापनेचा रौप्यमहोत्सवी सोहळा 1985 मध्ये साजरा झाला तेव्हा या लढय़ातील अनेक बिनीच्या शिलेदारांना भेटण्याचा योग आला होता. दादर स्टेशनजवळ अडवाणी नावाच्या पोलीस अधिकाऱयाला जनक्षोभापासून कसं वाचवलं आणि प्रतापगडावर शिवरायांच्या पुतळय़ाचं अनावरण करायला आलेल्या पंतप्रधान नेहरूंसमोर निदर्शनं करून मराठी जनतेची भावना त्यांच्यापर्यंत प्रत्यक्ष कशी पोचवली याचं वर्णन एस.एम.नी केलं होतं. ते म्हणाले होते ‘प्रतापगडाच्या वाटेवर आम्ही 30 हजार निदर्शक शिस्तीत, रस्त्याच्या दुतर्फा उभे होतो. ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ या घोषणेने आसमंत दुमदुमला. मोटारीत बसलेल्या नेहरूंनी, यशवंतराव चव्हाण यांना विचारलं-‘ते कसल्या घोषणा देतायत?’ चव्हाण उत्तरले- ‘ते म्हणतायत आम्हाला मुंबईसह महाराष्ट्र पाहिजे’ त्यावर नेहरू उद्गारले ‘ते थोडा काळ वाट का पाहत नाहीत?’… ही गोष्ट यशवंतरावांकडूनच एसेमना नंतर समजली. थोडक्यात, मुंबईसह महाराष्ट्राची संकल्पना नेहरूनाही हळूहळू पटत होती. चिंतामणराव देशमुख यांनी महाराष्ट्रासाठी बाणेदारपणाने केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामाही दिला होता.
तरीही महाराष्ट्र-गुजरात यांच्या एकत्रित ‘द्वैभाषिक’ राज्याचा अनैसर्गिक खेळ केंद्र सरकार खेळत होतं. हे संतापजनक होतं. त्याचं दर्शन नेहरूंना घडलं. द्वैभाषिकाची संकल्पना किती हास्यास्पद आहे हे सांगताना आचार्य अत्रे यांच्यातला विडंबनकार जागा झाला. त्यांनी द्वैभाषिकाचे अभंगच लिहिले. त्याच काळात ‘मावळा’या नावाने बाळासाहेब ठाकरे यांची मोरारजी सरकारचे आणि केंद्राच्या अवसानघातकी योजनांचे वाभाडे काढणारी व्यंगचित्रे ‘मराठा’मधून प्रसिद्ध होत होती.लढय़ाच्या ऐन भरात सर्वसामान्य जनताही हिरीरीने भाग घेत होती. अहिल्याताई रांगणेकर यांनी त्याचं वर्णन करताना म्हटलं, अगदी सर्वसामान्य गृहिणी या लढय़ात उतरल्या. दादरला आमची महिला परिषद झाल्यावर सत्याठाहासाठी आलेल्या वृद्ध गंगाबाई एरंडे, माटुंगा लेबर कॅम्पमधल्या गोदाबाई देठे आणि कॉ. गुलाबराव गणाचार्य यांच्या मातोश्री काशीबाई गणाचार्य आमच्या सत्याठाहाला प्रेरणा देत होत्या.’ कॉ. गुलाबराव गणाचार्य यांचं घरच या सत्याठाहात सामील झालं होतं. गुलाबरावांचे चिरंजीव विजय गणाचार्य सांगतात, ‘आजी अहमदाबादच्या तुरुंगात, वडील नाशिकच्या तुरुंगात तर चिंचपोकळी येथे सत्याठाह करून माझी आई माझ्या दोन वर्षांच्या बहिणीसह येरवडय़ाच्या तुरुंगात गेली, तिथेच माझे काकाही होते.’ असं एकेक घर लढत होतं. या सर्वाच्या परिश्रमाला फळ आलं. ज्यांनी बलिदान दिलं त्यांच्या हौतात्म्यातून आणि शिस्तबद्ध आंदोलनामुळे नेहरू सरकारला नमावं लागलं. शाहीर अण्णाभाऊ साठे, आत्माराम पाटील, गव्हाणकर यांच्या तेजस्वी कवनांनी लढय़ाला स्फूर्ती दिली. शाहीर अमर शेख यांनी दिल्लीच्या संसदभवन परिसरात झालेल्या सत्याठाहात ‘जनतेच्या सत्येची ज्योत जागती, गर्जा संयुक्त महाराष्ट्र भारती’ आणि ‘जाग मराठा, आज जमाना बदलेगा’ या पहाडी आवाजातील कवनांनी समस्त दिल्लीकरांचे लक्ष वेधून घेतले. जुन्या दिल्लीपासून संसदभवनापर्यंत हजारो मराठी स्त्री-पुरुष सत्याठाही निर्धाराने, मिरवणुकीने गेले. या सात-आठ किलोमीटर मार्गावर दिल्लीकरांना महाराष्ट्राच्या सामर्थ्याचं दर्शन घडलं. अमर शेख यांचे पोवाडे तिथले पोलीसही विस्मयतेने ऐकत राहिले. संसदभवनातली मंडळी दुरुन हा तीन-चार हजार मराठी बांधवांचा अभूतपूर्व सत्याठाह न्याहाळत होती. त्यात तान्हुली कडेवर घेतलेल्या महिला आणि साठी उलटलेली वृद्ध मंडळीही होती. ही 27 जुलै 1956 च्या सत्याठाहाची गोष्ट. 18 डिसेंबर 1958 रोजी कडाक्याच्या थंडीत मराठी जनांनी पुन्हा एकदा दिल्ली दणाणून सोडली!
अखेर जनआंदोलनामुळे पंडित नेहरूंनी महाराष्ट्राची मागणी मान्य करावीच लागली. त्यांच्याच हस्ते 1 मे 1960 रोजी मुंबईच्या राजभवनात मुंबईसह महाराष्ट्राचा नकाशा झळकला. महाराष्ट्राचा मंगलकलश आणण्याचे कार्य यशवंतरावांनी केले. 30 एप्रिलच्या सायंकाळी मुंबईत शिवाजी पार्क येथे पंतप्रधान नेहरूंची महाराष्ट्र राज्याची द्वाही फिरवणारी सभा झाली. त्याच मध्यरात्री आमच्या राजावाडीतूनही विजयाची मशाल मिरवणूक निघाली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ाचं ते तेजस्वी प्रतीक होतं.
आज मात्र महाराष्ट्र राज्य स्थापनेचा षष्टय़ब्दीपूर्ती सोहळा मोठय़ा प्रमाणावर साजरा करण्यासारखी परिस्थिती नाही. याचं कारण म्हणजे कोरोना नावाच्या अदृश्य शत्रूने अवघ्या जगाला वेठीला धरलंय. आपण सारे ‘लॉकडाऊन’मध्ये आहोत. संयुक्त महाराष्ट्राचा लढा आपण रस्त्यावर उतरुन जिंकला. हा कोरोनाविरुद्धचा विचित्र लढा घरात बसून, सरकारी आदेशांचे पालन करून जिंकायचा आहे. ती शिस्त पाळताना आज मनोमन एकशे पाच हुतात्म्यांना वंदन करूया. जे संयुक्त महाराष्ट्रासाठी लढले त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करूया आणि बेळगावातील मराठी बांधवाना लवकरच न्याय मिळेल अशी आशा बाळगून ‘जय महाराष्ट्र’ म्हणू या!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here